'केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतेस फार...' लहानपणी वाचलेले हे वाक्य. याचा खरा अर्थ मी अनुभवला, ते देशविदेशातील पर्यटनाच्या माध्यमातून. सहलींदरम्यान केलेला प्रवास, भटकंतीचा अनुभव जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा ठरला! नवनवीन लोकांशी केलेला संवाद, तेथील खाद्यसंस्कृती, पेहराव, इतिहास यांची प्रत्यक्ष ओळख होते. प्रत्येक ठिकाणी नवनवीन अनुभव येतो आणि याच अनुभवातून जगण्याची नवी उम्मेद मिळते. मंडळी, थोडक्यात काय...तर वर्षातून किमान एकदा तरी पर्यटन करावेच, मग ती अगदी शॉर्ट ट्रिप का असेना! टूर लिडर म्हणुन माझ्या करिअरची सुरुवात झाली ती शिमला-कुल्लू-मनाली सहलीने. नॉर्थ इंडियाच्या सहलींपासून सुरु केलेला हा प्रवास आज इंटरनॅशनल टूर्सपर्यंत पोहचला आहे. पण या सगळ्यामध्ये 'सिक्कीम-दार्जिलिंग' या डेस्टिनेशनने मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'सिक्कीम-दार्जिलिंग' सेक्टरच्या माझ्या १२०हुन अधिक सहली झाल्या आहेत. पण प्रत्येक भेटी दरम्यान नाविन्यपूर्ण ओळख देणारे हे ठिकाण आजही मला साद घालते. मनालीचा पांढराशुभ्र बर्फ, नैनितालचा अप्रतिम नैनी लेक, मुन्नारचे टी गार्डन, हिमालयीन माउंटन रेंज...निसर्गाची ही मुक्तहस्ते उधळण एकाच ठिकाणी अनुभवायची असेल, रिव्हर राफ्टिंग, रोपवे, रॉक क्लायंम्बीगचे थ्रिल एकाच ठिकाणी घ्यायचे असेल तर या सगळ्यांचा परिपुर्ण अनुभव देणारे अप्रतिम डेस्टिनेशन म्हणजे 'सिक्कीम-दार्जिलिंग'! 'पश्चिम बंगालचं स्वित्झर्लंड' अशी दार्जिलिंगची ओळख आहे. जगातील अतिउंच पर्वतरांगांपैकी एक कांचनजंगा पर्वतरांगावर दिसणारी सूर्यकिरणांची सोनेरी रंगाची उधळण, विस्तारलेल्या चहाच्या मळ्यातील सर्वदूर पसरलेला सुगंध आहाहा...!!! मन प्रसन्न करणारा हा अनुभव संस्मरणीय ठरतो. तर सिक्कीममधील व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंगचा अनुभव, धर्मचक्र केंद्र म्हणून प्रसिद्ध असणारे रुमटेक मॉनेस्ट्री किंवा पूर्व सिक्कीम जिल्ह्यातील साधारण १२,३१३ फूट उंचावर असणारा प्रख्यात त्सोमगो लेक, नाथू ला पास बॉर्डरची भेट अविस्मरणीय ठरते. आज आपण याच 'सिक्कीम-दार्जिलिंग'बद्दल बोलणार आहोत. भारतातील अनेक हिल स्टेशन ब्रिटिशांनी विकसित केली आहेत. पण या हिल स्टेशनस्टची खरी ओळख दाखवत त्यांचा लोकांच्या मनात घर करण्यामध्ये बॉलिवूडचा मोठा वाटा आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या 'मेरे सपनो की रानी' या गाण्यामुळे दार्जिलिंगला एक वेगळीच ओळख मिळाली. 'आराधना' चित्रपटातील या गाण्याचे चित्रीकरण दार्जिलिंगमधील प्रख्यात टॉयट्रेन आणि जवळपासच्या परिसरात केले आहे. आजही या गाण्यांचे सूर ऐकू येताच दार्जिलिंगची टॉयट्रेन आणि निसर्गरम्य परिसर नजरेसमोर येतो. या गाण्यामध्ये राजेश खन्ना यांनी टोपी आणि जॅकेटचा जो पोशाख परिधान केला होता त्याची क्रेझ अद्यापही कायम आहे. येथील गिरीभ्रमणप्रेमींना आकर्षित करणारे 'हिमालयीन माउंटेनेरिंग इन्स्टिट्यूट’ (एचएमआय) हेच ते ठिकाण आहे जिथे माउंट एव्हरेस्ट पहिल्यांदा सर करणाऱ्यांपैकी एक शेरपा तेनसिंग नोर्गे यांचा पुतळा आहे. येथील टॉयट्रेनने भारतातील सर्वात उंचावर स्थित 'घूम' रेल्वे स्टेशन बघता येते. पीस पॅगोडा, जॅपनीज टेंपल अशी अनेक विलोभनीय पर्यटन स्थळे या ठिकाणी आहेत. कोणतेही प्रशिक्षण नसले तरी आपण तेनझिंग रॉकवर रॉक क्लायम्बिंगचा अनुभव घेऊ शकतो. दार्जिलिंगचे अजून एक मुख्य आकर्षण म्हणजे येथील चहाचे मळे. ४०० एकरहून अधिक जागेवर 'हॅपी व्हॅली टी इस्टेट' हे टी गार्डन विस्तारले आहे. आज आपण कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलो की, आपल्याला दार्जिलिंगच्या चहाचा पर्याय हमखास दिसतो. साईटसीईंग सोबत येथील व्हेज, नॉनव्हेज मोमोज, थुकप्पा या स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. जर्मनचा ब्लॅकफॉरेस्ट केक जसा प्रसिद्ध आहे तसा दार्जिलिंगमधील ग्लेनरीजचा केक जगप्रसिद्ध आहे. दार्जिलिंगच्या मंतरलेल्या आठवणींसोबत सिक्कीमही घर करून आहे. देव आनंद यांच्या गाजलेल्या 'ज्वेल थीफ'चे चित्रीकरण सिक्कीममध्ये झाले आहे. या चित्रपटातील 'ये दिल ना होता बेचारा', 'दिल पुकारे आरे आरे' ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. या चित्रपटामुळे सिक्कीमला पर्यटनाच्या नकाशावर एक वेगळी ओळख मिळाली. सिक्कीमची राजधानी गंगटोकला प्रवास करताना येथील व्हाईट वॉटर राफ्टिंगचा अनुभव रोमांचक असतो. गंगटोकचा विहंगम नजारा जिथून दिसतो तो शांती व्ह्यू पॉईंट, प्रख्यात नालंदा इन्स्टिट्यूट, बौद्ध धर्माच्या स्थापत्यकलेचा सर्वोत्तम नमुना असणारे गोल्डन स्तूप अशी अनेक लोकप्रिय स्थळे या ठिकाणी आहेत. भारतीय सैनिक हरभजन सिंग यांना समर्पित प्राचीन बाबा हरभजन सिंग मंदिराचे दर्शन, सिक्कीमला चीनच्या तिबेट प्रदेशाशी जोडणारी नाथू ला बॉर्डर या ठिकाणाची भेट अविस्मरणीय ठरते. आजही मला सिक्कीम-दार्जिलिंगच्या माहितीसाठी फोन आला, तर मी तेथील रस्त्यांपासून ते मस्ट व्हिजिट पर्यटन स्थळांपर्यंत इत्यंभूत माहिती देऊ शकतो. या डेस्टिनेशनची टूर संपली तरी ती जागा, तेथील आठवण बराच काळ मनात रेंगाळत राहते. 'केसरी'ने पर्यटकांसाठी सिक्कीम-दार्जिलिंग सहलीचे ६ विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तर मंडळी, यातील आपली आवडती सहल निवडा आणि सह-कुटुंब, मित्रपरिवारांसह 'सिक्कीम-दार्जिलिंग'च्या सुरक्षित, सुरळीत आणि संस्मरणीय सहलीला चला, फक्त केसरीसोबत. 'केसरी'च 'आपलं माणूस' मायबाप पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.